सोहळे जीवनाचे

सोहळे जीवनाचे
भेट अधुरी स्वप्न अधुरी,प्रेमाची भूक अधुरी 
पांगळ्या जीवनाचे, किती मी सोहळे करावे 

जगण्याशी संघर्ष पैशासाठी संघर्ष, आपुलकीची शुष्क झोळी 
चिरफाटलेल्या जीवनाचे, किती मी सांधण करावे 

नाती नामपूर्ती मैत्री कामपूर्ती, ओलाव्याची तृप्तता उपाशी 
उसवलेल्या नातीगोत्यांचे, किती मी ठिगळ जोडावे

श्वास शिणला प्राण शिणले, पळण्याचे बळच संपले 
अर्धमेल्या जीवनाचे, किती मी विवरण करावे

डोंगर दुःखाचे डावपेच सुखाचें, मनामनाचे कारस्थान निराळे
गनिमीकावे जीवनाचे, किती मी उध्वस्त करावे 

थकला देह थकली काया, आत्म्याचा निरर्थक सहवास
साम्य अगम्य जीवनाचे, किती मी अलक्ष्य करावे @Savita BK

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *